Tuesday 21 August 2018

मुडागड

शिवारण्यात दडलेला - मुडागड


प्रतिक्षा ! एखादया गोष्टीची प्रतिक्षा करावी आणि प्रत्येक वेळी त्याच गोष्टीने आपल्याला हुलकावणी दयावी, असे काहीसे माझे ह्या किल्ल्याबाबत झाले. कधी माहिती अभावी तर कधी सोबती अभावी हा किल्ला मला झुलवत होता. तसे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १३ किल्ले त्या पैकी १२ किल्ले पाहून बरीच वर्षे लोटली परंतु ह्या तेराव्या किल्ल्याने मात्र मला फार प्रतिक्षा करायला लावली. कोल्हापूरच्या दुर्गमहार्षी श्री भगवान चिले सरांच्या पुस्तकात बरीच माहिती मिळाली पण ह्या पुस्तकाची आवृत्ती फारच जुनी होती. नवीन माहिती मिळेपर्यंत प्रतिक्षा करावी लागली.
शिवारण्य ! छत्रपती शाहू महाराजांच्या अभिनव उपक्रमाची व द्रष्टेपणाची साक्ष. पन्हाळा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पडसाळी गावानजीक छत्रपती शाहू महाराजांनी शिवारण्य नावाचे राखीव जंगल ठेवले होते. ह्याच शिवारण्याच्या गर्भात मुडागड नावाचा किल्ला दडलेला आहे. चहुबाजूने निबीड अशा जंगलाने वेढलेला मुडगड हा पर्यटक व प्रशासन या दोहोंकडूनही दुर्लक्षीत आहे. मुळात असा कोणतातरी किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे हे बय्राच लोकांना माहितही नाही. किल्ला पाहण्याची इच्छा तर सतत बळावत होती. किल्ल्याची सध्याची माहिती कोठून मिळवावी ह्या विवंचंनेत असतानाच फेसबुक वर शिवशक्ति प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सागरभाऊ कडव यांची मुडागड संदर्भात पोस्ट वाचनात आली. लगोलग सागरभाऊंना फोनवर संपर्क साधला. सागरभाऊंनी गडावर पोचण्यास लागणारी इत्यंभूत माहिती सांगितली आणि बजाऊन सांगितले की, पडसाळीतून वाटाड्या घेतल्याशिवाय जाऊ नका. माहिती मिळताच गड पाहण्याच्या इच्छेने उभारी घेतली. उन्हाळ्याची सुट्टी सुरु असल्याने सोबतीही लगेचच तयार झाले. एके दिवशी राम प्रहरी पाठीवर दुपारचे जेवण घेऊन आम्ही १० जण ५ बाईक वरुन बाहेर पडलो.
कोल्हापूरहून कोकणात जाण्यासाठी पूर्वीच्या काळी काजीर्डा घाटाचा वापर केला जात असे. ह्या काजीर्डा घाटातून होणाय्रा वाहतूकीवर नजर ठेवण्यासाठी घाटापासून जवळच मुडागड बांधण्यात आला. चहूबाजूने घनदाट जंगल हेच शक्तिस्थान असलेला मुडागड समुद्रसपाटी पासून ६९८ मिटर ऊंचीवर आहे. कोल्हापूरहून मुडागड पाहण्यासाठी आपण दोन मार्गांचा वापर करु शकतो. एक कोल्हापूरहून गगनबावडा रस्त्याला असणारे कोदे गाव गाठून तेथून पुढे गड चढाईस सुरुवात करता येते अन्यथा कोल्हापूर – कळे – बाजारभोगव वरुन पुढे पडसाळी ह्या गावातून गडास रस्ता आहे. किल्ल्याभोवती असलेल्या  घनदाट जंगलाच्या चिलखतामुळे किल्ला नवख्या माणसास सापडणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. दोन्ही पैकी कोणत्याही रस्त्याने गेल्यास गडावर जाण्यास वाटाड्या घेणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. गडावर फारसे कोणी जात नसल्यामुळे गावातील काही मोजक्याच लोकांना गडावर जाण्याची वाट माहित आहे . कोदे गावातून वाटाड्या मिळणे तसे कठीण असल्यामुळे बरेचसे दुर्गप्रेमी पडसाळी गावातून गड पाहण्यास जातात.
तासाभरातच आमच्या गाडया कोल्हापूरच्या प्रसिध्द रंकाळातलावा वरुन पुढे गगनबावडा मार्गावरुन पडसाळीकडे धाऊ लागल्या. कळे गावातून आम्ही कोल्हापूर – गगनबावडा मार्ग सोडून अणुस्कुरा रस्त्याला असणारे बाजारभोगाव गाव गाठले. बाजारभोगाव मधून पुलाच्या अलीकडील डाव्या रस्त्याने किसरुळ – काळजवडे करत तासाभरातच आम्ही पडसाळीत पोहोचलो. पडसाळी गावात छोटेसे धरण असल्यामुळे दुर्गम भाग असूनसुध्दा रस्ता अतिशय चांगला होता. कळे ते पडसाळी हा मार्ग दुतर्फा असणारी विविध झाडे, शेती, डोंगर यामुळे निसर्गाची नाना रुपे पहायला मिळत होती.
                जेमतेम ४० – ५० उंबरे असणारे पडसाळी हे गाव. गावात धरण झालं म्हणून गावात रस्ता आणि विज तरी आली नाहीतर हे गाव तस दुर्गमच म्हणावे लागेल. आम्ही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळे समोर पोहोचलो. सुट्टी असल्यमुळे शाळा बंद होती. दोन चार पोरं घरासमोरच्या अंगणात खेळत होती. त्या पोरांकडे गडाविषयी चौकशी करता डोंगराकडे हात करत म्हणाली, “ तीकडं कुटंतरी हाय बगा, आमी कवा जायाला न्हाई तिकडं”. इथे सागरभाऊंचे शब्द आठवले, वाटाडया घेतल्याशिवाय जाऊ नका. आता वाटाडया शोधण्याची मोहिम सुरु झाली. वर्षाऋतू जवळ असल्यामुळे गावातील जवळ – जवळ सर्वच कर्ती पुरुष मंडळी रानात कामाला गेली होती. त्या पोरांपैकी एकाला सोबत घेऊन रानात काम करणाय्रा एका माहितीगार गावकय्राला शोधून काढला. गड व परिसर दाखवण्याचे मानधन ठरवून घेतलं तसं तो म्हणाला, “तुमी व्हा म्होरं आणि शाळेम्होरं थांबा, मी आलोच हातातलं काम आटपून अर्ध्या घंटाभरात”. 
शाळेजवळ एका झाडाखाली बसून आणलेल्या शिध्यातलं थोडं न्याहारी म्हणून खाऊन घेतलं. अर्धातास म्हणत वाटडयानं यायला तास लावला. वाटाडया येताच आमच्या पायी प्रवासाला सुरुवात झाली. शाळेसमोरील पाणंदीने पुढे काही अंतर चालून गेल्यावर आम्ही नदीवर पोचलो. पूर्वी ह्या नदीला फक्त पावसाळ्यातच पाणी असे परंतु धरण झाल्यापासून ही नदी उन्हाळ्यात सुध्दा झुळूझुळू वाहत असते. येथून पुढे किंवा गडावर पाण्याचा काही स्त्रोत नसल्यामुळे येथेच नदीतील पाणी भरुन घेऊन गडचढाईला सुरुवात केली. डोंगरावर एक झरा असला तरी त्याला पाणी असण्याची शाश्वती नसते.
                  नदीपासून शेतवडीतून काही अंतर चालून गेल्यावर डोंगर चढाला लागलो. हा चढ चढून १५ ते २० मिनीटांत आम्ही डोंगर माथ्यावर पोचलो. डोंगरमाथ्या वरुन मागे वळून पाहिल्यावर डोंगराच्या कुशीत वसलेले पडसाळी गाव, धरण व धरणाच्या बॅकवॉटरचे विहंगम दृश्य नजरेस पडले. येथेच डोंगर कपारीत दाट झाडांच्या छायेत एक झरा आहे. पूर्वी हा झरा बारमाही होता पण सध्या त्याचे पाणी डिसेंबर जानेवारीतच आटते. येथून पुढचे जंगल हे अक्षरशः घनदाट वाढलेले होते. निसर्गदेवतेने घनदाट जंगलाच्या रुपाने आपल्या डोक्यावर छत्री धरल्याने येथून पुढचा प्रवास उन्हातसुध्दा सुखकर वाटत होता. येथून पुढे तीन डोंगर चढ व दोन पठारे चालल्यावर आम्ही गडमाथ्यावर येउन पोचलो. वाटेत ठिकठिकाणी पूर्वी आलेल्या दुर्गप्रेमींनी रस्ता ओळखण्यासाठी केलेल्या खुणा दिसल्या पण त्या अगदीच जुन्या वा पुसट होत्या. गडावर पोचण्यास आम्हाला साधारण दिड ते दोन तासांचा अवधी लागला. 
गडमाथ्यावरील जंगल अगदीच अस्ताव्यस्त वाढलेले असल्यामुळे गडमाथ्यावर फिरणे फारच कठीण होते. गडाचे सर्व बांधकाम, इमारती उध्वस्त झालेले असून त्यातून मोठमोठे वृक्ष उगवून आलेले आहेत. गडावर सध्या किल्ला असण्याची एकमेव खूण म्हणजे १० ते १५ फुटांची तटबंदी तेवढी पाहता आली. बाकी सर्व किल्ला हा जंगलाने गिळंकृत केला आहे. गडमाथ्यावर झाडीत सर्वत्र गडावरील इमारतींचे दगड विखुरलेले नजरेस आले. तटबंदी सोडता गड असण्याची कोणतीही ओळख माथ्यावर आढळली नाही.  गडाची ही अवस्था बघता मन अगदी विषण्ण झाले व त्याचबरोबर प्रशासनाच्या उदासीनतेची चीड आली.  गडमाथ्यावरुन आपल्याला गगनगड व विशाळगड हे किल्ले नजरेस येतात.
              गडाच्या तटाला लागूनच एक पायवाट कोदे गावाच्या दिशेने जाते. ह्या पायवटेने काही अंतर चालल्यावर जंगलातील प्राणी खाली गावात जाऊ नयेत म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी खोदलेला चर आपणास पाहता येतो. त्याचबरोबर हत्तींना जलक्रीडा करण्यासाठी करण्या साठी खोदलेला तलाव पाहता येतो. सदयस्थितीत हा चर झाडाझरोट्यांनी पूर्णपणे भरलेला तर तलाव कोरडा पडलेला दिसून आला. राजर्षी शाहू महाराजांनी हे जंगल शिवारण्य म्हणून राखीव ठेवले होते. ह्या जंगलात महाराजांनी एक अभिनव उपक्रम राबवला तो म्हणजे परदेशातून रानहत्ती आणून त्यांनी ते ह्या जंगलात सोडले. महत्त्वाचे  म्हणजे आपल्या नैसर्गिक अधिवासात नसूनसुध्दा त्यातील एका हत्तीणीने पिलाला जन्म दिला. याच अरण्याचा एक भाग म्हणून हे चर व तलाव राजर्षी शाहू महाराजांनी बांधले होते. रयतेबरोबरच निसर्गाचीही इतकी काळजी घेणारा राजा इतिहासात दुसरा झाला नसेल.
चर व तलाव पाहून परत गडमाथा गाठला. ३ – ४ तासांच्या पायपिटीमुळे व जंगलातील शुध्द हवेमुळे कडाडून भूक लागली होती. गडमाथ्यावरच झाडीत थोडी मोकळी जागा बघून सोबत आणलेली शिदोरी सोडली. भरपेट खाऊन थोडा वेळ येथेच विश्रांती घेऊन आल्या वाटेने गड उतरण्यास सुरुवात केली.
           जंगलात आम्हाला ऐन, बेहडा, हिरडा, पळस, अंजन, जांभूळ, उंबर इत्यादी वृक्ष तसेच नरक्या, दातपाडी, शिककाई सारख्या औषधी वनस्पती, तमालपत्री सारख्या मसाल्याच्या वनस्पती पहायला मिळाल्या. मनुष्यप्राणी चुकूनच जंगलात येत असल्यामुळे विविध प्राणी, पक्षी, फुलपाखरे, किटक यांनी हे जंगल ओतप्रोत भरलेले आढळते. दयाळ,सर्पगरुड, कवडा, घार, स्वर्गीय नर्तक, धनेश, महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरीयाल, धोबी, इत्यादी पक्षी सहज नजरेस पडले. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु ब्लु मोरमॉन येथे ठिकठिकाणी बागडताना नजरेस आले. बरेचसे प्राणी हे निशाचर असल्याने व मानवाचा आवाज व गंधापासून दूर जाणारे असले तरी त्याच्या खाणा खुणा संबंध जंगलभर पसरलेल्या आढळतात. गवा, रानडुक्कर, ससा, साळींदर, भेकर इत्यादी शाकाहारी प्राण्यांची विष्ठा, पायाचे ठसे ठिकठिकाणी आढळले, दोन ठिकाणी तर अगदी पायवाटेवरच बिबळ्याची विष्ठा आढळली. 
उताराचा रस्ता, डोक्यावर झाडांची सावली व जंगलातला गार वारा यामुळे तासाभरातच आम्ही परत पडसाळीत पोहोचलो. पडसाळी गावातून जेमतेम ५ ते १० मिनीटांत आम्ही धरणाच्या भिंतीवर पोचलो. धरणाच्या निळ्याशार व थंडगार पाण्यात मस्त पैकी डुंबून चालून – चालून आलेला शिणवटा दुर केला व परतीच्या प्रवासाला लागालो.
          मुडागडाची दयनीय अवस्था व त्याची फारशी माहिती नसल्याने सहसा कोणी पर्यटक इकडे येत नाहीत. परंतु गडाचे उर्वरीत अवशेष, राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या उपक्रमाच्या खुणा, जैवविविधतेने भरभरुन ओसंडणारं जंगल, पडसाळी गाव व धरण परिसर ह्या सर्वांसाठी म्हणून एकदा तरी दुर्गप्रेमींनी मुडागडाला आवर्जून भेट द्यावी. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यातून प्रेरणा व निसर्गाच्या शुध्दतेतून नवीन उमेद घेऊन मुडागडाची सफर एका दिवसात पूर्ण करता येते.
                    - शार्दुल प्रमोद पाटीलकागल



3 comments:

  1. Sands Casino Review | Slots, table games, live dealer
    Play Online. No 1xbet korean Deposit Bonus. Welcome Bonus Up to $1000. 100% Up To $2000. Play Now. หาเงินออนไลน์ Casino. Slots. Casino. Mobile. Casino. Table septcasino Games. Poker. Bingo. Slots. Bingo. Welcome Bonus

    ReplyDelete