Wednesday 17 January 2018

पतंग



पतंग


मकर संक्रांत! ज्या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो, त्या तिथीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. सूर्य उगवण्याची जागा या दिवसा पासून उत्तरे कडे सरकत जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. महाराष्ट्रात हा सण भोगी संक्रांत व किंक्रांत सा तीन दिवस साजरा केला जातो.
            संक्रांत म्हटलं की काही गोष्टी प्रकर्षांनं आठवतात - पहिली भोगीची भाजी व बाजरीची भाकरी या दिवसात शेतातील पिके लेली असल्यामुळे  हरभरा, शेंगदाणे, गाजर, वाटाणे, वांगी, वरना अश्या भाज्या एकत्र
करून भोगीची भाजी केली जाते. त्याबरोबर कोर्ट्याची चटणी व बाजरीची भाकरी खाल्ली जाते. दुसरी गोष्ट तिळगुळ, तीळ व गुळ एकत्र करून त्याच्या वड्या किंवा लहान लहान लाडू केले जातात ते  “तिळगुळ घ्या व गोड गोड बोला”, म्हणत सर्वांना वाटले जातात. तिळ गुळ हे दोन्ही पदार्थ उष्ण असल्यामुळे वाढत्या थंडीत शरीरासाठी उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करतात.
            शेवटची पण सर्वात जास्त आनंद देणारी व लहान-थोर सर्वांनाच आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे, पतंग! रंगीबेरंगी रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे, काही कान डोळे असणारे, काही शेपटीचे तर काही बिनशेपटीचे, आकाशात उंच उंच उडणारे पण  जमिनीशी घट्ट नाते असणारे पतंग !
            जसजसा कामाचा व्याप वय वाढत गेलं तसतसे बालपणीच्या बऱ्याच गोष्टी सुटत गेल्या  लहानपणी संक्रांत जवळ आली की  दहा-पंधरा दिवस फक्त पतंग, पतंग आणि पतंगच सुचत असे. शाळेतून आल्यावर घरात दप्तर फेकतच आम्ही घराजवळच्या माळावर पतंग घेऊन हजर. तिथे पतंग उडवायला आधीच तीस-चाळीस जण
हजर असत. त्या सगळ्यांचा गलका, चढाओढ, पतंगांची स्पर्धा सगळं अगदी जोरदार पणे सुरू असे. जसजसा काळ बदलला, तसतसे खेळ बदलले आणि जे पतंग पूर्वी अगदी पन्नास-साठच्या संख्येने दिसायचे ते जवळजवळ  नाहीसेच झाले. कुठे तरी एखाद दुसराच आकाशात दिसू लागला.
आज १३ जानेवारी भोगी व योगायोगाने शनिवार आला. उद्या रविवारची सुट्टी असल्याने मी सकाळीच ठरवलं की आज संध्याकाळी माळावर पतंग घेऊन हजर व्हायचं. कोणी असो वा नसो, ते जुने सवंगडी भेटणं तर शक्यच नव्हतं पण आपण जायचं, पतंग उडवायचा व पतंगा सोबत मनाला पण आकाशात व बालपणीच्या आठवणी स्वच्छंद भरारी घेऊ द्यायची. दुपारी कॉले सुटता घर गाठलं. विकत आणून पतंग उडवण्यात मजा ती कसली ? म्हणून पतंग स्वतः करायचा ठरवला. घरातीलच एक पुस्तकांना कव्हर घालायचा कागद घेतला, कात्री, डिंक,दोन काटक्या घेऊन पतंग करायला सुरवात केली. मदतीला आमची दोन वर्षांची कन्या हजार! बरीच वर्ष पतंग केला नसल्यामुळे बरच काही विस्मृतीत गेलं होतं. जुनं जुनं सगळ पुन्हा नव्याने आठवुन पतंग केला व तो जमलाही. त्याला एक लांबलच शेपूटही जोडलं. तंग तर जमला पण, आता खरा प्रश्न पडला तो म्हणजे, सुत कसं बांधायचं ? घ्या आली पंचाईत ! कस तरी आठवून सुत बांधलं, टेरेसवर जाऊन थोडं वाय्राला धरून बघितले तर तेही जमलं होतं. आजच्या मोहिमेची तयारी तर पूर्ण झाली. घरात मिळाली ती दोऱ्याची गुंडी उचलली, सोबत आमचा छोटा सैनिक घेतला व बाहेर पडलो. बाहेर आलो तर दारातच माझे तीन-चार लहान मित्र की ज्यांच्या सोबत मी नेहमीच काहीना काही उनाडक्या करत असतो ते “काका! काका! तुम्ही पतंग डवणार काय ?” म्हणत पळत आले. मनात आनंद झाला, म्हटलं चला दोन-चार साथीदार तरी मिळाले.
टीम तर तयार झाली, पण खरी कसोटी तर पुढे होती. पतंग उडवणे हे फार जिकिरीचे व कौशल्याचे काम होते. दोरा बांधला व एकाच्या हातात गुंडी दिली, पतंग रून एकाला उभे केले व मांजा माझ्या हातात घेतला. वाऱ्याचा अंदाज घेतला व पतंग वाल्याला आरोळी दिली “टाक वर”. वाऱ्या बरोबर पतंग वर उडाला आणि १०-१५ सेकंदातच गिरक्या घेत जमिनीवर आदळला. परत त्याला पतंग उचलायला सांगीतला व परत वाऱ्याचा अंदाज घेऊन आरोळी दिली, गंमत म्हणजे परत परिणाम तोच. असं साधारण पाच-सहा वेळा तरी झालं. मन थोडसं खट्टू झालं, पण प्रयत्न सोडणे हे स्वभावात नसल्यामुळे पतंग उचलणं व परत उडवण सुरूच राहिलं. समाधानाची बाब इतकीच होती की दर वेळी पतंग काही जास्त वेळ आकाशात रहात होता. पुढच्या आठ-दहा प्रयत्नात आकाशात पतंग स्थिर ठेवण्यात यशस्वी झालो. जसजसा पतंग आकाशात उंच भरारी घेऊ लागला तसे सर्वच आनंदी झालो आणि मी माझ्या बालपणीच्या आठवणीत रमलो.
        आम्हाला पतंग उडवताना पाहून आसपासचे दोघे तिघेही पतंग घेऊन आले. आमच्या सोबत तेही पतंग उडवु
लागले. थोडं बरं वाटलं की अजूनही कुणीतरी उत्सुक आहे. अशीच पंधरा-वीस मिनिटे निघून गेली व खरी गंमत सुरू झाली – काटा-काटी’. मग काय ? नुसता दंगा आणि रोळ्यांना त आला, ‘ताण दे –ताण दे’, ‘दोरा गुंडाळ’,’दे हिसडा’, त्यात काही आमच्या कोल्हापुरात लाडाने उच्चारले जाणारे फुल्या-फुल्यांचे *** शब्द यांनी सगळा माळ दुमदुमून गेला आणि इतक्यात पहिला पतंग काला गेला,  तो नेमका माझाच. काटलेला पतंग परत नाही मिळवला तर मग तो मी कसला ? हातातली गुंडी तिथेच टाकून अगदी सातवी-आठवीच्या पोरासारखं पतंगाच्या मागे धूम ठोकली माझ्या मागे आमच्या बाल चमूने. नजर वर पतंगावर असल्यामुळे पायाकडे कोण बघत? दगड, माती, गवत, झुडूप, काटे कसलेही भान राहिले नाही. पतंग पण चांगलाच ४००-५०० मीटर लांब जाऊन पडला. एकदाचा पतंग हातात घेतला आणि मगच पाय थांबले. एखादा वल्डकप मिळवावा अशा आविर्भावात घामानं निथळत, धापा टाकत परत आलो. पुन्हा पतंग दोरीला बांधला व दिला आकाशात सोडून. चांगला अंधार पडे पर्यंत, नवीन सवंगडी व जुन्या आठवणींना उजाळा देउन पतंग मकर संक्रांत गोड करून गेला आणि जाताना कानात एकच म्हणाला, “मित्रा! अजूनही तू बच्चा आहेस, असाच रहा”.
                                                                                                         -शार्दुल प्रमोद पाटील.