Friday 1 December 2017

निवारा

निवारा  

         आमच्या कॉलेज लायब्ररीतील स्टडी रूम हे निवांत विचार करत बसण्याचे माझे अत्यंत  प्रिय ठिकाण आहे.  ह्याला कारण इथल्या खिडकी बाहेर असणारे मोठे कॅशियाचे  झाड.   इथे बसाव व झाडावर  किलबिलाट करणारी पाखरं बघावी, त्यांच उडणं, बागडणंगिरक्या घेण बघावं, तुरू तुरू धावणारी खारुताई पहावी व आपल्या विचारांचा वारू चौफेर उधळू द्यावा.
     या झाडावर गोमेट, धनेश, तांब, चन्ना पोपट,  दयाळ, धोबी, ईत्यादी साधारण चाळीस-पन्नास प्रजातींचे पक्षी वेगवेगळ्या ऋतूत सहज दृष्टीस पडतात.  कावळ्याची तीन-चार घरटी, ढोलीत राहणार पोपटाच  कुटुंब, पाच-सहा खारीच्या जोड्या या झाडावर नेहमीच दिसत. ढोलीत आत बाहेर करणारे पोपट, उगाच इकडेतिकडे चोच बडवत नाचणारा तांब,  कुहुकुहु अशी सुरेल तान देणारी कोकिळा,  धोब्या सारख्या लहान पक्षांचा किलबिलाट, च्यक च्यक आवाज करत एकमेकांशी पाठशिवनिचा खेळ खेळणाऱ्या खारुताई पाहण्यात मन हरखून जातं.

            आज सकाळीच स्टडी रुम मध्ये जाण्याचा योग आला. खिडकीतून बाहेर नजर टाकली तर झाडाची एक आडवी फांदी तोडलेली दिसून आली. पाखरांच मात्र सारच अलबेल सुरू होतं. दुपारी पुन्हा अभ्यासासाठी वर गेलो आणि खिडकीतून बाहेर जे पाहिले  क्षणभर त्यावर विश्वासच बसला नाही. सकाळी पानं फुलं पक्ष्यांना घेऊन डौलानं  उभ  असणारं झाड पाच-सहा तासातच जमिनीपासून बाजूला ओंडके होऊन  पडलं होतं. बाजूच्या construction site वरच्या कामगारांनी कटर लावून  त्या सजीवाचा निर्जीव ओंडक्यात रूपांतर केलं होतं. खळकन डोळ्यात पाणी तरळून गेलं.  गेल्या पाच सहा वर्षातला  हा माझा सोबती अचानक नाहीसा झाला होता.  काही वेळातच दुःखाच रूपांतर रागात झालं.


           अरे! काय केलंत?  स्वतःचा निवारा बांधायच्या नादात शे-दोनशे निष्पाप जिवांचा निवारा नष्ट केलात?  किती हा हव्यास?  सगळं तुम्हालाच कसं पाहिजे?  विश्वकर्म्याने बुद्धी दिली म्हणून सगळच लपेटत  सुटला ?   ह्या विश्वातल्या  सगळ्याच गोष्टींवर स्वतःची मालकी सांगत सुटलात ?  आम्हाला निसर्गरम्य ठिकाणी फिरायला पाहिजे,  निसर्गात जाऊन selfie काढला पाहिजे, आमच्या गाड्या झाडांच्या सावलीत उभ्या करायला पाहिजेत,  पाऊस पाणी हवामान  सगळं सगळं कस अगदी व्यवस्थित पाहिजे, इतकच काय जगण्यासाठी ऑक्सिजन सुद्धा आम्हाला निसर्गातूनच पाहिजे. अरे!  मग हा निसर्ग राखायचा कोण?  स्वतःच्या स्वार्थासाठी तरी राखूया.  आता कुठेतरी आपली  सगळं ओरबडायची भूक  थांबवायला हवी.  की सगळं ष्ट करूनच थांबणार आहोत आपण ?  निसर्ग बदलतोय,  ऋतुचक्र दलतेय,  वातावरण दलतेय  आतातरी स्वतःला बदलू नाहीतर हा निसर्गच एक दिवस आपल्याला बदलेल.  आता  इथ थांबूया ! आपण आत्तापर्यंत जे केलय  त्याची भरपाई नसेना पण जे शिल्लक आहे कमीतकमी त्याचं रक्षण तरी करूया.
- शार्दुल प्रमोद पाटील, कागल.