Wednesday 18 July 2018

किल्ले कर्णाळा


पक्षी अभयारण्याच्या अंतरंगात दडलेला – किल्ले कर्णाळा 


पनवेल पासून मुंबई – गोवा महामर्गावर अदमासे १३ कि.मी. वर कर्णाळा पक्षी अभयारण्य वसलेले आहे. ह्याच पक्षी अभयाराण्याच्या पोटातून एक उंच सुळका नजरेस येतो, हा सुळका म्हणजेच कर्णाळा किल्ला. सुट्टीसाठी पनवेल येथे काही दिवस राहण्याचा योग आला. दुर्गभटकंतीची आवड असल्यामुळे कोठेही गेलो तरी जवळपास असणारा एखाद-दुसरा किल्ला पाहण्याचा शिरस्ताच गेल्या कही वर्षांपासून पडला. अवघ्या १३ कि.मी. वर असणारा किल्ला व अभयारण्य न पाहता राहणे हे मानवणारं नव्हतं. कडकडीत उन्हाळा जरी असला तरी किल्ला बघायचा म्हटल्यावर पर्वा कशाची ?
            एक दिवस सकाळी कॅमेरा उचलला, पाण्याची बाटली घेतली, डोक्याला शिरस्त्राण घातले व मारली बसकण गाडीवर. भल्या सकाळीच बाहेर पडल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ फारच कमी होती. कही वेळातच पनवेल मधून बाहेर पडलो तर समोरच कर्णाळ्याचा सुळका खुणावू लागला. सुमारे अर्ध्या तासातच अभयारण्याच्या गेटवर पोहोचलो. गेटवर असणाय्रा अधिकाय्राकडून रितसर पावती घेऊन अभयारण्यात प्रवेश केला. 
अभयारण्यात प्रवेश करताच माकडांच्या एका टोळीने स्वागत केलं. तीन – चार मादया, दोन नुकतेच वयात आलेले नर व काही पिल्ली. मला पाहताच पिलं आपापल्या आईला जाऊन बिलगली. आयांनी अंदाज घेत मला रस्ता मोकळा करुन बाजूचे झाड जवळ केले तर एक थोटया हाताचा नर तसाच रस्त्याकडेला बसून राहिला. जणू काय तो मला जाणवून देत असावा की, हे क्षेत्र माझे आहे. सूर्योदया बरोबर अभयारण्यात पोचल्यामुळे पक्षी निरीक्षणाची योग्य वेळ साधली गेली. अभयारण्यात मोरटका, हरियाल, ताडबा अशा वेगवेगळ्या निसर्गवाटा आहेत. सरळ गडवाट जवळ न करता साडेचार चौ. कि. मी. च्या परिसरात पसरलेल्या अभयारण्यात फेरफटका मारुन मग गडावर जायचे ठरवले.

        एकटाच असल्यामुळे आज भटकताना कसलेही बंधन नव्हते. सकाळच्या रम्य वातावरणात अगदीच प्रसन्न वाटत होते. उन्हामुळे वाळलेल्या गवताला आलेला सोनेरी रंग सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांत आणखीन झळाळून निघत होता. गळून पडलेल्या पानांचा झाडाखाली गालिचा पसरला होता. काही झाडांना नुकतीच नवीन पालवी येत होती. करवंदाच्या जाळीला आलेली कच्ची करवंदे ओरडून सांगत होती, ‘आम्ही येतोय !’. मोराने आपल्या प्रेयसीला बोलवण्यासाठी घातलेली साद, कोकीळेची तान, हळद्याची शिटी, कवड्याचा हुंकार, माझ्या जंगलातील अस्तित्वाची जणीव होताच कळपाला सावध करण्यासाठी नर वानराने केलेला हुहुहुप असा इशारा ह्या सर्वांतून निर्माण होणाय्रा मधुर संगीतात मिसळणारा माझ्या पावलांचा आवज. हे निसर्गाच संगीत, निरनिराळे पक्षी, वृक्षराज, वेली, फुले न्याहाळत एकटाच भटकताना एक वेगळाच अनुभव येत होता. असाच चालत चालत एका वळणावर पोचलो तर समोरच साधारण १५-२० फुटांवर एक कोल्हा येउन थबकला. त्याच्या अनपेक्षीत समोर  येण्याने मी व माझ्या अनपेक्षित समोर येण्याने तो दोघेही दचकलो. हातातला कॅमेरा सावरेपर्यंत त्याने जंगलात धुम ठोकली.
गरुड, हळदया, मोर, घार, तांबट, धनेश असे साधारण ३० ते ४० प्रजातींचे पक्षी भटकंती दरम्यान पहायला मिळाले. असाच रमत गमत भटकत दोन अडीच तासात अभयारण्यात ठेवलेल्या पक्षांच्या पिंजय्रा जवळ पोचलो. मुक्तपणे आकाशात विहार करणारे पक्षी अशा सुंदर वातावरणात पहायचे सोडून पिंजय्रात कैद असणारे पक्षी पाहण्यात समाधान मानणाय्रा पर्यटकांची कीव आली. येथेच वनविभागाचे विश्रामगृह व चहा – नाष्टा मिळणारे एक उपाहारगृह आहे. ह्या परिसरात वनविभागाने विविध माहिती फलक लावलेले आहेत.
विश्रामगृहाच्या बाजूनेच गडावर जाणारी वाट आहे. विश्रामगृहाजवळ कही वेळ विश्रांती घेऊन गडाची वाट जवळ केली. येथुन पुढे किल्ल्याच्याचढाईला सुरुवात होते. किल्ल्याची ऊंची ८४५ मी. जरी असली तरी हा चढ चांगलाच खडा व दमछाक करणारा होता. पायवाटेच्या दुतर्फा असलेल्या गर्द वनराईमुळे उन्हाचा तडाखा थोडा कमी जाणवत होता. काही अंतराच्या चढाईनं तर डोंगर माथ्यावरील सपाटीवर येऊन पोचलो. ह्या सपाटीवरुन सह्याद्रीचे आगळे – वेगळे रुपडे दर्शन देऊ लागले. वर्षाच्या तिन्ही ऋतुत सह्याद्री आपणाला स्वतःचे वेगळे दर्शन घडवतो. वर्षाऋतूत पावसाच्या असंख्य जलधारांनी न्हाउन हिरवेगार वस्त्र परिधान केलेला सह्याद्री, हिवाळ्यात सर्वांगावर सोनेरी गवताची लव पांघरलेला एखाद्या पितांबर नेसलेल्या ऋषी प्रमाणे वाटणारा सह्याद्री तर उन्हाळ्यात तालमीतली तांबडीमाती अंगाला फासून घेतलेल्या काळ्याकभिन्न मल्लासारखा भासणारा सह्याद्री.

ह्या सपाटीवरुन सरळ समोर कर्णाळ्याच्या माथ्यावर असणारा सुळका खुणावू लागला. किल्ल्यावर जाणारी पायवाट पूर्ण मळलेली असल्यामुळे व ठिकठिकाणी शिरढोणच्या क्रांतिकारी मित्र मंडळाने फलक लावले असल्यामुळे वाट शोधण्याची गरज लागली नाही. आणखी थोडी चढाई केल्यानंतर कर्नावती मंदिराजवळ येऊन पोहोचलो. मंदिरात कर्नावती देवीची सिंहावरुढ मूर्ती आहे. येथून काही अंतरावरच किल्ल्याच्या पायय्रा व दरवाजा आहे. या बाजूने किल्ल्याला ३०-४० पायय्रा आहेत. या पायय्रा चढून गडाच्या पहिल्या दरवाजात पोचलो. ह्या दरवाजाची बरीचशी पडझड झालेली आहे. येथून आणखी काही पायय्रांवर दुसरा दरवाजा आहे. दरवाजावर दगडात शरभ शिल्प, तर चौकटीत कमळ पुष्प कोरलेले दिसले. हा दरवाजा बराच सुस्थितीत असल्यामुळे गड पाहण्याचा उत्साह द्विगुणित झाला. येथून जवळच तिसरा दरवाजा आहे. तीसय्रा दरवाजातून आत जाताच गडमाथ्यावर येऊन पोहोचलो.
गडमाथा अगदीच आटोपशीर असल्यामुळे मन काहीसे हिरमुसले. बुरुजावर फडकणाय्रा भगव्या ध्वजाला मुजरा घालून मोर्चा गडावरच्या अवशेषांकडे वळवला. गडावर फारसे कोणी पर्यटक नसल्यामुळे गड अगदी सवडीने पाहता आला. ध्वजाच्या समोरच वाडयाचे अवशेष आहेत. सध्या या वाड्याचे छत कोसळलेले आहे. येथे जवळच आणखी काही पडके अवशेष व तटबंदी आहे. तटबंदीत बरीच झाडे वाढलेली आहेत. हे सर्व पहात सुळक्यच्या पायथ्याला आलो अन पाहतो तर काय ? काळया कातळात कोरलेली ८-१० पाण्याची टाकं. वाकून आत पाहिलं तर सर्व टाक्यांत पाणी पण जवळ – जवळ सर्वच टाक्यांतील पाण्यावर हिरवे शेवाळ पसरलेले. पाहत पुढे गेलो तर शेवटच्या टाक्यातील पाणी मात्रअगदी स्वछ व नितळ होते. टाक्यात उतरुन थोडे पाणी पिऊन बघितले तर पाणी अगदी चवदार व थंड होते. स्वतः सोबत आणलेले पाणी जवळच्या एका झाडला घालुन टक्यातील पाण्याने रसनेची तहान भागवली.
त्या ऊंच सुळक्याला वळसा घालून किल्ल्याच्या दुसय्रा भागात पोहोचलो. ह्या भागात तटबंदी, दोन
बुरुज व माचीवर जण्यासाठी दरवाजा आहे. ह्या दरवाजाच्याही दोन्ही बाजूस शरभ शिल्पे कोरलेली आहेत. दरीतून येणारी वाय्राची झुळूक व दरवाजाच्या कमानीची सावली यामुळे येथे छान गारवा जाणवत होता. दरवाजाच्या उंबय्रात बूड टेकून सभोवतालचा निसर्ग न्याहाळत काहीवेळ विश्रांती घेतली. येथून सभोवार पाहिले असता मुंबई- गोवा महामार्ग, माथेरान, मदनगड अशी ठिकाणे नजरेत येतात. परत पुन्हा पाण्याच्या टाक्यातून पाणी भरुन घेतले व परतीचा मार्ग धरला.
सातवाहन काळात खोदलेली पाण्याची टाकं, त्यानंतर निजामशाहीचा अंमल, १६५७ ला स्वराज्यात दाखल झाला. पुरंदरच्या तहात मोघलांकडे किल्ला गेला परत काही वर्षातच स्वराज्यात सामील झाला वा त्यानंतर पेशव्यांकडून १८१८ मध्ये इंग्रजांनी जिंकला. त्यानंतर स्वातंत्र्य युध्दात वासुदेव बळवंत फडक्यांनी ह्या किल्ल्याच्या आश्रयाने इंग्रजांशी काही काळ लढा दिला. अशी वेगवेगळी इतिहासाची पाने उलगडणारा हा किल्ला आज अखेरची घटका मोजत आहे.
मुंबई पुण्याहून येणारे पर्यटक येथे येऊन इथल्या इतिहसाच्या पाऊलखुणा अनुभवयच्या सोडून आपल्या प्रेमाचे गोडवे येथील दगड भिंतीवर लिहिण्यात धन्यता मानत आहेत. कर्णाळा अभयारण्याच्या कुशीत वसलेल्या या किल्ल्याचे संवर्धन होणे फारच गरजेचे आहे. तरच आपल्या पुढच्या पिढ्या इतिहासाचे पान उलगडून पाहू शकतील.
- शार्दुल प्रमोद पाटील, कागल